जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,काल्लेखेतपाडा पायपीट नव्हे पायवाट

  पायपीट नव्हे पायवाट


शाळेचा नव्हे भविष्याचा रस्ता



         असं म्हणतात की गावात मंदिर नसेल तर चालेल पण एक आदर्श शाळा असली पाहिजे..! शाळा हे समाज प्रबोधन व उद्याच्या भविष्याचा कणा आहे. असाच काहीसा अनुभूती माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा  ता. धडगाव जिल्हा नंदूरबार या  सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी पाड्यावरच्या  शाळेत अनुभवास मिळाली...

 
   
  भविष्य उद्याचे इथेच कीलबिलते या थीम द्वारे चालणाऱ्या माझ्या शाळेतल्या चिमुकल्या मुलांनी आज लांबून शाळेत येणाऱ्या दुर्गम व जंगलातून, डोंगरातून शिक्षणाची ज्ञानगंगा अविरतपणे घेण्यासाठी येणाऱ्या आपल्या मित्रांसाठी स्वतः रस्ता तयार करण्यासाठी सरसावले हे आमच्या साठी नक्कीच भूषणावह आहे.  आमच्या शाळेत काल्लेखेतपाड्या वरिल मुले ३५ ते ४० मुले आहेत.. बाकीचे मुले ही उमराणी, खुटवडा, कामोद, भिलाम बारीपाडा, सावरिपाडा, मुवाडी पाडा, ओहाया पाडा वरची किमान ७० मुले ही रोज पायी १ ते ४.३०  अंतरावरून आमच्या शाळेत येतात.. तर किमान २५ ते ३० मुले वलवाल, गेंदा, माळ, भूषा, खर्डी, सोन, राडी कलम, टेंभुर्णी, आमला, कंज्या पाणीपाडा  इथली मुले ही मामाच्या, आत्याच्या, मावशीच्या , बहिणीच्या घरी राहून शिक्षण घेतात...  आमच्या या मुलांनी आपल्या मित्रांना शाळेत येताना त्रास होऊ नये म्हणून रस्ताच नाही बनवला तर उज्ज्वल भविष्याचा रस्ता सुकर केला. 
            भविष्याचा वेध मुलांच्या वैयक्तिक  आयुष्याला  नव्हे तर त्यांच्या भावविश्वाला लागला पाहिजे.. याचे सुसंकेत यामुळे आम्हाला जाणवलं.. शाळा मागील ७ ते ८ वर्षात १७ ते १८ पटावरून जर १४० पटापर्यंत पोहचत असेल तर त्यात शिक्षकाची भूमिका जितकी ठळक तितकीच त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या बालमनाचा ही वाटा आहे.. कमी नव्हे कणभर जास्तच..!! आमच्या मुलांना याची जाणीव निर्माण झाली हेच खरे तर आमच्या मेहनतीची ऊर्जा आहे..
      गावात येण्यासाठी कसलाच रस्ता नाही साधी पायवाट .या वर्षी रास्ता मंजूर झाला पण गावात मंजूर असलेला रस्ता  गावकरी रस्ता नको आम्हाला वर्गखोली  पाहिजे म्हणून वर्ग खोली बांधतात आणि मुले आपल्या मित्रांसाठी शाळेत येताना त्रास होऊ नये म्हणून रस्ता दुरुस्त, साफसफाई करतात तेव्हा नक्कीच म्हणावा वाटतो की मुले शाळेचा नव्हे तर भविष्याचा रस्ता सुकर करत तर नसतील ना..!! यातून प्रेरणा घेऊन एखादा आदर्श समाज घडत गेला तर नक्कीच शिक्षक म्हणून आमचा ही उर नक्कीच भरून येतो... !!
     


हौसले बुलंद हैं इन पंखो में
उडान की राह आसान नही
जितने कि आंस हैं मन में
रोखने का दम वक्त में नहीं

Post a Comment

1 Comments