असं कसं ते पुन्हा आले..🤔

असं कसं ते पुन्हा आले..🤔


आजची बातमी अचानक येऊन धडकली.जी राज्यातील राजकारण आणि सामान्य माणसाला हादरवून ठेवणारी होती. इतके दिवस सत्ता स्थापनेबाबत भांडणारे एकमेकांवर टीका करून निवडून आलेले सर्वात मोठे पक्ष आज एकत्र आले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाची शपथ घेतली. होय हे खरं आहे. ही कोणतीही अफवा नाही तर खरं आहे…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिद्ध करून दाखवलं की,’ ते पुन्हा आले’ असच म्हणावं लागेल.


कालपर्यंत याबाबत कोणताही खुलासा करण्यात न आल्याने सगळेच थोडे गोंधळले आहेत. पण जनतेला अंधारात ठेऊन केवळ राज्याला स्थिर सरकार मिळावे यासाठी ही युती केल्याचे मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पण जर तुम्ही जनतेचा विचार करत आहात. स्थिर सरकारसाठी एकत्र येत आहात तर तुम्ही असे चोरी-छुपे शपथविधी ग्रहण सोहळा पार कसा पडला? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

एक कट्टर राष्ट्रवादीकर जिथं भाजपला नाव ठेवत होता तेच आता भाजपचा झेंडा हातात घेईल का?, आणि जिथे राष्ट्रवादीला पाण्यात पाहणारे, विरोधक म्हणूनही शिल्लक ठेवणार नाही, राष्ट्रवादी राज्यातून संपेल, या विधानांवर टाळ्या वाजवणारे आता राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधतील.

निवडणुकीत एकमेकांना नाव ठेवणारे लोक एकत्र आले यांचं म्हणजे अस झाली की, ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्याविना करमेना’. या दोघांना करमल नाही म्हणून हे पक्ष एकत्र आले. पण , बाकीच्याच काय? शिवसेना जी मुख्यमंत्री पदासाठी एनडीएतुन बाहेर पडली. ज्यांनी बंड पुकारला. तिच्या हातात काय मिळालं. शरद पवार यांच्याशी वारंवार चर्चा करणारे संजय राऊत आणि शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावर अडून बसलेली काँग्रेस या दोघांची भूमिका नेमकी काय असेल.

रोज सकळी पत्रकार परिषद घेणारे संजय राऊत आज काय बोलतात की परवा सारखे न बोलताच हात हलवत परत जातात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. असो राज्यात मोठी घडामोड झाली आणि भाजपच्या हिरमुसल्या चेहऱ्यावत हसू आलं.

असो हे शेवटी राजकारण आहे. भाजप दावा करणारी गोड बातमी अखेर राज्याला मिळाली. याने  काहींची झोप उडाली. पण असो आता मान्य करावेच लागेल. भाजप- राष्ट्रवादीला शुभेच्छा…





Post a Comment

0 Comments