सातपुड्यातील आदिवासींची अवस्था

सातपुड्यातील आदिवासींची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. या भागातील आदिवासी आपला आणि आपल्या कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी, दोनवेळचे नाही, पण निदान एकवेळचे खाऊन पोटाची खळगी भरता यावे यासाठी वणवण भटकून मिळेल ते, मिळेल त्या स्थितीत खाण्याची तयारी असते. अहोरात्र झटून रक्ताचे पाणी आणि हाडाचे काड्या कराव्या लागतात. तेव्हा कुठेतरी पाणी पोटभर पिता येईल इतपर्यंत अन्न वजा खाद्यपदार्थाची व्यवस्था होते.
गरीबी ही सातपुड्यातील आदिवासींच्या पाचवी पूजलेली आहे. त्यांचा विकास व्हावा यासाठी शासन स्तरावर अनेक योजना राबविल्या जातात. त्यातील काही नावालाच असतात. खरंच, राबविण्यात येणाऱ्या योजना प्रामाणिकपणे & प्रभावीपणे राबवून त्या गरजूंपर्यंत पोहचविल्या असत्या, तर आज अशी परिस्थिती राहिली नसती.
सातपुडा परिसरात विशेष करून अक्राणी (धडगाव) तालुक्यात स्वातंत्र्यानंतरच्या काळात कुठल्याच रोजगाराची निर्मिती करण्यात आली नाही. दरवर्षी हजारो आदिवासी बांधव रोजगारासाठी परराज्यात घरदार सोडून स्थलांतर करतात.
सातपुड्यातील आदिवासी बांधवाच्या नावाने अनेक योजना आहेत. परंतु वैद्यकीय, शैक्षणिक, आरोग्य, वीज, पाणी, रस्ते इत्यादी सारख्या सुविधा नगन्य आहे. ५०% भागामध्ये या प्राथमिक सुविधांचा वाणवा आहे. तेथे जाऊन फेरफटका मारला तर कळेल की, हे लोक कसे जगतात.
कित्येक आदिवासी अपत्ये कुपोणाने मृत्यू पावतात आणि काही जगलीच तर त्याला जिवंत राहण्यासाठी रोजच मरावे लागते. परिसरात कुठेही दर्जेदार शिक्षण नाही, नाही चांगल्या दवाखान्याची सोय. घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. आजच्या स्पर्धेच्या युगात त्याला दोन वेळेच्या भाकरीसाठी झगडावे लागत आहे. तरीही तो आपली कधीतरी उषःकाल होईल, या आशेने आपले जगणं विसरत नाही.

                                                                                                   ###shivapawara


Post a Comment

0 Comments