चला भारत देश वाचवू या... कोरोनाला हरवू या

गेल्या महिन्यापासून या कोरोना ने देशभर हाहाकार माजवला आहे...भारतातील प्रत्येक राज्याची कोरोना ग्रस्ताची स्थिती बघितली तर आकड्याने हजारो गाठले आहे....दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे...एका अतिसूक्ष्म विषाणूने जगात थैमान घातले, अन् या जाणिवेतून मन अंतर्बाह्य हादरून गेलं.. मनच काय सगळ्यांची दुनियाच हादरली म्हणा ना,,,, मग ती वैयक्तिक असो,कौटुंबिक असो की वैश्विक असो,,, अशा सर्वासाठीच गहन प्रश्न बनलेला हा #कोरोना विषाणू...

                                                       

या २१ व्या दशकात २४ तास ऑनलाईन राहणारी माणसे सुशिक्षित,,पण बेजबाबदार म्हणावी लागतील. या शतकातलं सर्वात मोठे संकट दाराशी असताना आपल्या पृष्ठभागावरून काड्या ओवाळून कोणत्याही सूचना व आदेशांना न जुमानता सर्रास रस्त्यावरती फिरणारी तरुणाई शिक्षणासाठी झटलेल्या महापुरुषांच्या मुखात मारलेली एक चपराकच म्हणावी लागेल. सुशिक्षित तरुण पिढी व त्यांचे अनुकरण करणारे अनुयायी फक्त आपल्या इगोसाठी समस्त भारतवासीयांचे प्राण कळत - नकळत संकटात टाकत आहे.आपल्या मूर्खपणाची अजून काय चिन्ह द्यावीत , जे सरकारी कर्मचारी आपले घर,समुले, बायको, आई वडील यांना सोडून संसर्गाचा धोका आपणास होऊ नये म्हणून अहोरात्र रस्त्यावरती गस्त घालतात आणि आपण भारताचे सुजान सुज्ञ नागरिक त्यांना हुलकावणी देत या कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढवण्याचा जणू विडाच उचलताय. महासत्ता असलेल्या अमेरिका व आरोग्यसेवेसाठी प्रगत असलेल्या इटलीसारख्या देशांनी या संकटासमोर अक्षरशहा गुडघे टेकले असताना छू -छा आणि असंख्य अंधविश्वासावर विश्वास ठेवून जगणाऱ्या या देशात हा विषाणू काय थैमान घालेल याची कल्पना न केलेलीच बरी.



पृथ्वीवरील संपूर्ण देशात भारतासहित या विषाणूंचा संसर्ग दहशत असताना इतर देशांच्या तुलनेत भारतीय काय करताय? तर भारतीय या संकटावर अति हास्यास्पद विनोद बनवताय गाणी बनवत आहे आणि संचारबंदीत एकत्र येऊन कोरोना विषाणूला खुलेआम मेजवानी देताय. माझ्या मित्रांना, भावांना  तसेच तमाम भारतीय जनतेला हेच कळकळीचे सांगणे आहे ही वेळ आहे राष्ट्रीय एकात्मता दाखवण्याची, ही वेळ आहे आपले कर्तव्य चोखपणे बजावण्याची . देशातील सर्वात मोठ्या संकटाशी संयमानी लढण्याची . घरीच राहण्याची घरातून कुणालाही न निघू देण्याची , ऐकमेकांची काळजी घेण्याची व घेण्यास सांगण्याची . ही वेळ आहे जात, धर्म, भेदभाव, उच्च-नीच एकमेकांचे मंदिरे, मशिदी, चर्च, विहार यांच्यावरचे मतभेद बाजूला सारून टिका न करण्याची, ही वेळ आहे इतिहासात प्रथमच एकत्र न येता, आपापल्या घरात राहूनच या संकटाशी लढा देवून इतिहास घडवण्याची. ही वेळ आहे माझा भारत महान बनवण्याची,,,,


अवघे विश्व करोनाग्रस्त झालेले असून जगभरात प्रचंड गोंधळ आणि धाकधुकीचे वातावरण निर्माण झालेले आहे. भुतो न भविष्यती अशी हतबल परिस्थिती सर्वत्र बघायला मिळत असून संपूर्ण मानवजातीला वैद्यकीय क्षेत्राचा एकमेव आधार उरलेला आहे. मात्र सध्यातरी वैद्यकीय क्षेत्र करोनाच्या मुसक्या आवळण्यात फारसे यशस्वी ठरलेले नसले तरी झुंज अजून सरली नाही, आम्ही अजुनही हरलो नाही याचा प्रत्यय सगळीकडे येत आहे.खरेतर आपल्याकडे वैद्यकीय क्षेत्रासाठी किती निधी खर्च केल्या जातो किंवा आम जनतेला कितपत वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात हा जरी वादाचा विषय असला तरी आपला देशावर सध्या जी करोनारुपी राष्ट्रीय आपत्ती ओढवली आहे त्याचा सामना याच उपलब्ध वैद्यकीय सेवेकडून केला जात आहे. 

                                          

शासकीय रुग्णालये आणि शासकीय इतरही संस्था या संकटसमयी देशाच्या सेवेत ठामपणे पाठीशी उभ्या असतांना खाजगी वैद्यकीय सेवेबाबत मात्र संभ्रम निर्माण झालेला आहे. प्रचंड लोकसंख्या, तुलनेत कमी उपलब्ध असलेली सरकारी वैद्यकीय यंत्रणा यामुळे खरेतर खाजगी वैद्यकीय क्षेत्राची जबाबदारी अशा प्रसंगी आणखी वाढलेली आहे. किंबहुना करोनारूपी आपत्तीला परतवून लावताना खाजगी वैद्यकीय क्षेत्र आपला खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. याकरीता खरंच गरज आहे ती आपल्या कोषातून बाहेर पडण्याची, समाजाप्रती आपली असलेली बांधिलकी जपायची आणि पवित्र वैद्यकीय सेवेची जपणूक करण्याची.


वैद्यकीय क्षेत्राएवढेच संरक्षण क्षेत्रसुद्धा आपल्या प्राणांची बाजी लावून अहोरात्र सिमेवर आणि सिमेअंतर्गतही आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांनाही घर, मुलेबाळे, आई-वडील, नातेवाईक आणि स्वत:च्या जीवाची काळजी आहेच. मग ते मुंबई बॉम्बस्फोट असो की २६/११ चा हल्ला असो अथवा संसदेवरचा हल्ला असो. लष्कर, सिआरपीएफ, एसआरपीएफ, पोलिसदल, होमगार्ड किंवा नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीत धाऊन जाणारे एनडीआरएफ, एसडीआरएफचे जवान असोत की अग्निशमन दल असो‌‌,,, प्रत्येक व्यवसाय अथवा नोकरीत बऱ्यावाईट जोखिम असतातच. मात्र यामुळे कर्तव्यापासून लांब राहणे कितपत योग्य आहे?विचार करा बुलेटप्रुफ जॅकेटची पर्वा न करता शहिद तुकाराम ओळंबेंनी कसाबला पकडले नसते तर मुंबईत रक्ताचा आणखी सडा पडला असता.

 पोलिस अधिकारी शहिद हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासारख्या जांबांज शुरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन मुंबईला वाचवतांना मागचा पुढचा विचार न करता कर्तव्याला प्राधान्य दिले होते.केवळ सिमेवर जाऊन शत्रुंशी लढणे म्हणजेच देशसेवा नव्हे तर आपापल्या जागी, आपापल्या परीने कर्तव्य पार पाडणे ही सुद्धा एक देशसेवाच आहे.समाज सुधारायला हवा, देश सुसज्जीत हवा असे प्रत्येकाला वाटते मात्र याकरिता सुधारक मात्र शेजारच्या घरात जन्माला यायला हवा अशी आपली मानसिकता असते. करोनारुपी संकट आ वासून उभे असतांनाच सर्वात जास्त अपेक्षा आणि जबाबदारी वैद्यकीय व्यवसायीकांचीच आहे. निश्र्चितच तुटपुंज्या साधनांद्वारे या आपत्तीशी दोन हात करणे म्हणजे आ बैल मुझे मार सारखे आहे. सरकारनेही वैद्यकीय व्यवसायीकांकरीता आवश्यक ते सुरक्षा साहित्य विमा संरक्षण इ. उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. मात्र तोवर वैद्यकीय व्यवसायीकांनी आपली जबाबदारी झटकून कसे चालणार? येणारा प्रत्येक रुग्ण करोनाग्रस्त असलेच असे नाही मात्र या भितीने इतर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांचा वाली कोण असणार....


चला भारत देश वाचवू या... कोरोनाला हरवू या
"धर्मभेद हे संपणार नाहीत
तुझं माझं केलं तर कदाचित,
उद्या कोणीच वाचणार नाही.
सध्या जबाबदारीचे क्षण हे
सर्वांनी घ्यावे अंगीकारूनी,
कोरोनाशी लढा देऊ आपण
सारे आपल्याच घरात राहू."

Post a Comment

0 Comments